रत्नागिरी:- जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली जाते. जानेवारी 2021 पर्यंत झालेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यात दूर्धर आजाराने ग्रस्त असलेली 52 मुले आढळून आली. त्यातील ह्यदयाला होल असलेल्या मुलांसह विकलांग आणि अल्पदृष्टी मुलांचा सर्वाधिक समावेश आहे.
महिला व बालकल्याण विभागाकडून 2 हजार 871 अंगणवाडी क्षेत्रातील मुलांची तपासणी करण्यात आली. 2020-21 या आर्थिक वर्षात 0 ते 6 वयोगटातील 81 हजार 801 मुलांची तपासणी केली. त्यामुध्ये कुपोषित बालकांची संख्या अत्यंत घटलेली आहे. कोरेाना कालावधीतही मुलांच्या तपासणीत आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलेले नव्हते. उलट कमी वजनाच्या किंवा कुपोषित मुलांना अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच पोषण आहार देण्यात आला होता. त्याचा फायदाही झाला असून तिव्र कुपोषित मुलांच्या संख्येत घट झाली आहे; मात्र दुर्धर आजार झालेल्या मुलांचे प्रमाण दरवर्षीप्रमाणे यंदाही जैसे थेच आहे. 0 ते 6 वयोगटातील मुलांमध्ये दुर्धन आजाराने ग्रस्त असलेली 52 मुले सापडलेली आहेत. सर्वाधिक राजापूर तालुक्यात 11 मुले आहेत. यामध्ये ह्यदयाला होल असलेल्या मुलांचा टक्का अधिक असल्याचे महिला व बाल कल्याण विभागचे मत आहे. या मुलांवर दर्जेदार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करुन देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जातात. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक मुलांवर उपचार झालेले आहेत. यंदा नव्याने सापडलेल्या मुलांवरही उपचार सुरु आहेत.