कारभार प्रशासकांच्याच हाती, विकासकामांवर परिणाम
रत्नागिरी:- मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अजूनही जाहीर झालेला नसल्याने जिल्ह्यातील 471 ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकच कार्यरत आहे. सरपंच निवडीचा खेळखंडोबा सुरुच असून याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहेत.
कोरोना कालावधीत निवडणुका न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर पुन्हा निवडणुकांचे वेध लागले. महिन्याभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी होईल अशी शक्यता आहे. निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या ग्रामपंचायतींची माहिती आयोगाकडून मागविण्यात आली होती. त्यामुळे लवकरच निवडणुक कार्यक्रम जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती; परंतु अजुनही कार्यक्रम आलेला नाही. ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हातीच आहे. अनेक गावातील विकास कामे रखडलेली आहे. प्रशासकाकडून आवश्यक तसे लक्ष दिले जात नसल्याने प्रश्न प्रलंबितच राहीलेले आहेत. प्रशासकपदी अनेक अधिकार्यांची नियुक्ती केल्यामुळे त्यांना वेळे देणेही अशक्यच आहे. या परिस्थितीत लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहीजेत असे चित्र ग्रामीण भागात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ग्रामपंचायतीत प्राबल्य आहे. त्यांना शह देण्यासाठी भाजपही रणांगणात उतरले आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात भाजप विरुध्द सर्वपक्ष असे चित्र आहे. त्याची री रत्नागिरी जिल्ह्यात ओढली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायती निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे.