शिक्षक संघाचा पाठपुरावा; जि.प. अध्यक्षांकडून स्वाक्षरी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या 2006 सालच्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी देण्याबाबत दिरंगाई होत होती. यासाठी प्राथमिक शिक्षक संघातर्फे विशेष प्रयत्न सुरु होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यामुळे 431 प्रस्तावांवर सही झाली असून त्याचा लाभ शिक्षकांना मिळणार आहे.
चटोपाध्यायबाबत दरवर्षी डिसेंबर महिन्यातील शिक्षण समितीत चर्चा होत असे. फेब्रुवारी महिन्यात ती यादी व पुर्ततेचे आदेश बाहेर पडत होते. गेल्यावर्षी शिक्षक संघाचे सरचिटणीस दिलीप देवळेकर यांनी 2017 पूर्वीच्या प्रस्तावातील गोंधळाचा विषय शिक्षण विभागापुढे मांडला होता. ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयनुसार विद्या प्राधिकरणाकडील 10 दिवसांचे प्रशिक्षण अशी अट ठेवण्यात आली होती. पण त्यानंतर विद्याप्रधिकरणाकडून अशी प्रशिक्षणे कमी प्रमाणात आयोजित केली जातात.
अनेक शिक्षकांना ती करणे शक्य होत नाही. ही बाब संघटनेने लक्षात आणून दिल्यानंतर 21 डिसेंबर 2018 ला शुद्धीपत्रक काढून या प्रशिक्षणासाठी 31 मे2018 पर्यंतच्या लोकांना सुट देवून त्यापुढील 2018-19 पासून लोकांना लगतच्या पात्र सालाच्या पूर्वीच्या कोणत्या ही 3 पैकी 2 वर्षातील प्रशिक्षणे ग्राह्य धरली जातील असे सांगण्यात आले. या शासन निर्णयाचा आधार घेवून सांगली जिल्हा परिषदेने आदेश निर्गमित केले. याबाबत शिक्षण समितीत सविस्तर चर्चा झाली. तरीही प्रस्तावांवर निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे संघटनेने 3 ऑगस्ट 2019 ला पावसात धरणे आंदोलन केले होते. जानेवारी 2020 मध्ये पुन्हा आंदोलनाची नोटीसही दिली होती. शिक्षण समितीच्या सभेत शिक्षक संघटना सदस्यांनी चटोपाध्याय प्रस्तावांचे पुरावे सादर केले होते. ते तपासून परिपूर्ण 431 प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीच्या कालावधीत ते प्रस्ताव पुन्हा रखडले. हा प्रश्न जिल्हा परिषदेचे नुकताच अध्यक्षपदावर नियुक्त झालेले रोहन बने यांच्यापुढे मांडण्यात आला. बने यानी शिक्षकांचा हा प्रश्न निकाली काढण्याच्या सुचना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे यांना दिल्या होत्या. त्यानुसार नुकत्याच 431 प्रस्तावांवर सह्या झाल्या आहेत.