रत्नागिरी:- पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई तिव्र होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टंचाई उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 15 कोटी 94 लाखाचा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. यामध्ये 391 गावातील 585 वाड्यांना संभाव्य टंचाईची झळ बसू शकते. त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी आराखड्यात निधीची तरतूद केली आहे.
मोसमी पावसाचा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु होता. जिल्ह्यातील पाणी पातळी स्थिर असून टंचाईची तिव्रताही कमी राहणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने आराखडा तयार करुन जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. सुरवातीला 25 कोटीचा आराखडा प्रशासनाकडे पाठविला; परंतु प्रशासनाने तो कमी करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार 15 कोटी 94 लाखाचा अंतिम आराखडा सादर केला. तो मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अंतिम आराखड्यात 280 विंधन विहीरींसाठी 1 कोटी 96 लाख रुपयांची तरतूद केली आहे. नळ योजना दुरुस्तीसाठी 12 कोटी 78 लाखाची तरतूद केली असून 249 योजनांचा समावेश आहे. याचा फायदा 182 गावातील 290 वाड्यांना होणार आहे. तात्पुरती पुरक नळ पाणी योजनांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये ठेवलेले आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी गतवर्षी 35 लाखाचा खर्च आला होता. त्यानुसार निधीची तरतूद केली आहे. सर्वाधिक टंचाई खेड तालुक्यात 77 गावातील 110 वाड्यांना जाणवू शकते. यामध्ये संगमेश्वर, रत्नागिरी व दापोली तालुक्यात दोन कोटीहून अधिक निधीची मागणी करण्यात आली आहे.