रत्नागिरी:-कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यांतील 1710 गावांची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 347 गावांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षात बदललेल्या हवामानाचा आणि वातावरणाचा फटका शेतकर्यांना बसत आहे. वातवरणातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी व शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी गावातील छोटे व मोठे बंधारे यांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी या योजनेतून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतकर्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांकरिता 2 हेक्टर पर्यंत जमीन धारकांना 75 टक्के आणि 2.5 हेक्टर जमीनधारकांना 65 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानावर आधारित सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. वेळोवेळी गावपातळीवर शेतकर्यांना शेतीच्या विविध योजना लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्हाडे यांनी केले आहे.