जिल्ह्यातील 16 ग्रा. पं. च्या सार्वत्रिक तर 117 ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हयातील 16 सार्वत्रिक ग्रामपंचायती व तर 117 ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यांच्या पोटनिवडणूकांच्या निवडणूकांची रणधुमाळीला आज रंगणार आहे. आज 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून उद्या 6 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल त्या त्या तालुकास्तरावर दिला जाणार आहे.

या निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मंडणगड तालुक्यातील उन्हवरे आणि वाल्मिकीनगर, दापोली तालुक्यातील डौली, मांदिवली, कवडोली आणि बांधतिवरे, आंजर्ले, चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बु., कालुस्ते खु., टेरव, वालोपे, खेडमधील सुकीवली, संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे आणि कळंबस्ते, राजापूरमधील मोसम ग्रा.पं. तर लांजातील इसवली/ पनोरे या 16 सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज 5 नोव्हेंबर रोजी या निवडणूकीच्या मतदानाची रणधुमाळी रंगणार आहे. खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावर कडक नियोजन करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पशासन गुंतले आहे. सर्वच राजकीय शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट) आणि भाजपा या तीन मातब्बर पक्षांनी वर्चस्व काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अद्यापही नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. राज्यातील सत्तापालटानंतर ग्रामीण भागातील मतदारांमध्येही निवडणुकांसाठी उत्सुकता दिसून येत आहे. जिह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट व भाजपने आपला ठसा उमटवला होता. ठाकरे गट, राष्ट्रवादीनेही चांगली बाजी मारली होती. आता तर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटामध्ये जोरदार ठसन दिसून येत आहे, तर भाजपाकडूनही आपल्या वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी झालेली आहे. राष्ट्रवादी व इतर पक्षदेखील आपला ठसा उमटवण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. त्याचा प्रत्यय ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. ग्रामपंचायतींमध्ये सध्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या रणधुमाळीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रंगत येणार आहे.
आज रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वा. पासून ते सायंकाळी 5.30 वा. पर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे.