जिल्ह्यातील 12 हजार 694 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

रत्नागिरी:-येत्या 20 जुलैला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 12 हजार 694 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुटीचा फायदा घेत अभ्यासात झोकून दिले आहे. तर परिषदेकडूनही परीक्षेच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.

निकालानंतर गुणवत्ता यादीत पात्र ठरणार्‍या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा 100 रुपये तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती मिळते.

यंदा शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलैला घेतली जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील पाचवी व आठवीच्या 12 हजार 694 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी माहिती प्रपत्र तसेच आवेदनपत्र ऑनलाईन सादर केले आहे. तसेच परीक्षा शुल्क अदा केले आहे. जिल्ह्यात 9 तालुक्यात पूर्व प्राथमिकसाठी 91 तर पूर्व माध्यमिकसाठी 48 केंद्रे
आहेत.