रत्नागिरी:- कोकण परिक्षेत्राअंतर्गत जिल्ह्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात झाल्या आहेत. तर अन्य जिल्ह्यातून ९ अधिकारी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. कोकण परिक्षेत्राचे उप महानिरिक्षक संजय मोहिते यांनी बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत. रत्नागिरी शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड, चिपळूणचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, दापोलीचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांची रायगड येथे बदली करण्यात आली आहे. सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमधून कार्यकाळ पूर्ण झालेले तसेच विनंती अर्ज केलेल्या पोलीस निरिक्षक,सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उप निरिक्षक यांच्या बदल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दि. ७ ऑगस्ट २०१९ पासून कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक अनिल लाड यांची रायगडला बदली करण्यात आली आहे. कोरोना काळात त्यांनी शहरात उत्तम कामगिरी बजावली होती. तर नुकत्याच चिपळूण येथे आलेल्या महापूराच्या वेळी त्यांची कामगिरी उल्लेखनिय होती. याची दखल घेत स्वातंत्रदिनी त्यांचा गौरव करण्यात आला होता.चिपळूणचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांनीही कोरोना काळासह पूराच्या कालवधीत उत्तम काम केले होते. पोलीस हा फक्त कायद्याचा रक्षक नसून तो नागरिकांच्या मदतीला धावणारा शासनाचा पहिला प्रतिनिधी असतो हे श्री.पोळ यांनी दाखवून दिले होते. यांच्यासमवेत दापोलीचे पोलीस निरिक्षक राजेंद पाटील यांची त्यांच्या विनंतीवरुन रायगड येथे बदली करण्यात आली आहे.
बाणकोटचे प्रभारी अधिकारी सुशांत वराळे, प्रदिप गिते यांची हि बदली करण्यात आली आहे. श्री. वराळे यांची रायगडला तर श्री.गिते यांची पालघरला बदली झाली आहे. पोलीस उपनिरिक्षक समस बेग, महेश धोंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे विकास चव्हाण, जयगडच्या अस्मिता पाटील यांची रायगडला बदली करण्यात आली आहे.
तर रायगडमधून पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे, दादासाहेब घुटुकडे, सुजाता नानवडे यांची रत्नागिरीत बदली करण्यात आली आहे. तर सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकात घाग यांची ठाणे येथून तर संजय कानिवले यांची सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीत बदली करण्यात आली आहे.पोलीस उपनिरिक्षक विनायक माने, हर्षद हिंगे, गायत्री पाटील, शितल पाटील यांची रत्नागिरीत बदली करण्यात आली आहे.
कोकण विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आता नवे अधिकारी जिल्ह्यात हजर झाल्यानंतर जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकार््यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दोन प्रमुख शहरे असलेल्या चिपळूण, रत्नागिरी पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती होते याकडे दोन्ही शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.