रत्नागिरी:- भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांसोबत जीवन पद्धती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. शाश्वत व पर्यावरणपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.
माझी वसुंधरा अभियान टप्पा क्रमांक 4 मध्ये भूमी, वायू, जल, अनी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित मुद्द्यांवर मूल्यमापनासाठी ग्रामपंचायतींना 8 हजार गुण ठेवले आहेत. या अभियानांतर्गत केलेल्या कामाचा अहवाल ग्रामपंचायतींनी वेबपोर्टलद्वारे द्यावयाचा आहे. भूमी (हरित अच्छादन आणि जैवविविधता), वायू, जल, अग्नी, आकाश यातील कामांवर 8 हजार गुण ग्रामपंचायतींना मिळणार आहेत.
अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांची तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींना वारंवार भेटी देऊन मार्गदर्शन करणे, समन्वय साधणे, प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी, पंचायत सांख्यिकी, कृषी, शिक्षण, पर्यवेक्षिका, कृषी अधिकारी, शाखा अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती गटविकास अधिकार्यांमार्फत केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हे अभियान 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत आहे. ग्रामपंचायतींनी केलेल्या सर्व उपायांचा मूल्यमापनासाठी विचार केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.