रत्नागिरी:- महावितरण कंपनीपुढील थकबाकी वसुलीचे संकट काही कमी होताना दिसत नाही. आर्थिक वर्ष संपण्याची घाई सुरू असताना महावितरण कंपनीला वसुलीसाठी कठोर पावले उचलावी लागत आहेत. जिल्ह्यातील ८३ हजार ४७१ ग्राहकांनी महावितरणपुढे थकबाकीचा डोंगर उभा केला असून तो २२ कोटी ७५ लाख एवढा आहे.
घरगुती, वाणिज्य किंवा औद्योगिक ग्राहकांपेक्षा सार्वजनिक पथदीपची थकबाकी सर्वांत जास्त आहे. १ हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ९ कोटी ४६ लाख एवढी थकबाकी आहे. महावितरण कंपनी कोरोना महामारीनंतर मोठ्या आर्थिक संकटात आली आहे. कंपनीला उभारी देण्यासाठी थकबाकी वसुली महत्वाची आहे; परंतु थकबाकीचा आकडा कमी होताना दिसत नाही. आर्थिक वर्ष संपायला १५ दिवस शिल्लक असताना महावितरणची थकबाकी २२ कोटींच्यावर गेली आहे. वसुलीसाठी महावितरण कंपनीने कठोर पावले उचलून अनेकांची वीज जोडणी तोडली आहे तर काहींनी कारवाईनंतर वीजबिल भरली आहेत. जिल्ह्यातील घरगुती ६३ हजार ९८१ ग्राहकांकडे ४ कोटी ९२ लाख थकबाकी आहे. वाणिज्य ७ हजार १२५ ग्राहकांकडे २ कोटी १४ लाख, औद्योगिक १७८ ग्राहकांकडे १ कोटी १३ लाख रुपये थकित आहेत. कृषीच्या ५ हजार ३३३ ग्राहकांकडे १ कोटी ४ लाख, सार्वजनिक पथदीपच्या १ हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ९ कोटी ४६ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १ हजार १६४ ग्राहकांकडे २ कोटी १७ लाख, २ हजार १४ सार्वजनिक सेवांकडे १ कोटी २ लाख मिळून एकूण ८३ हजार ४७१ ग्राहकांकडे २२ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे. अन्य ग्राहकांच्या तुलनेत पथदीपची थकबाकी सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष समाप्तीमुळे पथदीपच्या बिलाचा भरणा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३१ मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे.