दिवसभरात एसटीच्या ५० फेऱ्या ; आंदोलन सुरूच
रत्नागिरी:- एसटी काम बंद आंदोलनाच्या शुक्रवारी १९ व्या दिवशीही कामगारांनी धरणे आंदोलन चालू ठेवले. परंतु आज ३२४ कर्मचारी कामावर हजर झाले. यामध्ये चालक, वाहकांची संख्या वाढल्याने त्यांनी जिल्ह्यात सुमारे ५० फेऱ्यांमधून सुमारे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. त्यामुळे थोड्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला. रात्रवस्तीच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. आज शनिवारपासून आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता आहे.
माळनाका येथील एसटी विभागीय कार्यालयाबाहेर आजही बरेच कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन चालू ठेवण्यासंदर्भात येथे चर्चा केली जाते. विलीनीकरणावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे हे आंदोलन आणखी काही दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील निर्णयानुसार कर्मचारी येथे आंदोलन करत आहेत. त्यामुळे कामावर हजर होण्यासंदर्भात आता मुंबईतून ठरेल त्यानुसार पावले उचलली जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आज सुमारे ५० फेऱ्या सोडण्यात आल्या. यामध्ये दापोली १४, खेड २, चिपळूण १२, देवरुख १६, राजापूर ८ या आगारातून फेऱ्या सुटल्या. यामुळे प्रवाशांनी चालक, वाहकांचे आभार मानले. कारण गेले १९ दिवस प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे दुःख प्रवाशांनी जाणून घेतले. त्यांचा पाठिंबाही आहे. परंतु कामावर जाण्यासाठी किंवा शाळा, कॉलेजमध्ये जाण्याकरिता सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर कधी हजर होणार याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, आज २ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे विभागातील ११० कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. ३१ जणांची सेवा समाप्त केली आहे. आमदार गोपिचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून काल माघार घेतली. त्यामुळे आता हे आंदोलन फक्त कर्मचाऱ्यांचे राहिले आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहे.