जिल्ह्यातील १ हजार ५३५ गावांचा भार ८४२ पोलिस पाटलांवर

३०९ पदे रिक्त ; अतिरिक्त ताणामुळे पोलिस पाटील हैराण

रत्नागिरी:- पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून पोलिस पाटील यांच्याकडे पाहिले जाते. गावात काही कायदेविषयक पेच निर्माण आल्यास पोलिस पाटील यांच्यामार्फत पोलिस प्रशासनाला माहिती दिली जाते. प्रशासन आणि पोलिस यांच्यातील दुवा म्हणजे पोलिस पाटील आहे. जिल्ह्यासाठी १ हजार १५१ पोलिस पाटील पदे मंजूर आहेत. ८४२ पदे भरली असून अद्याप ३०९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक पोलिस पाटील यांच्यावर गावांचा अतिरिक्त ताण आहे.  

गावात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले हे पद अनेक गावांमध्ये रिक्त आहे. त्यामुळे एकाच पोलिस पाटलाकडे अनेक गावांचा भार दिला जात आहे. जिल्ह्यात सुमारे १ हजार ५३५ गावे आहेत. आतापर्यंत १ हजार १५१ पदे मंजूर करण्यात आली असून पैकी ८४२ पदे भरण्यात आली आहेत. ३०९ रिक्त आहेत. पोलिस पाटील यांना मिळणारे मानधत तुटपुंजे आहे. त्या तुलनेत कामाचा भार अधिक आहे. महसुली हद्दीत काही दुर्घटना घडल्यास आधी पोलिस पाटील याला पोहोचावे लागते. रात्री-अपरात्री ही कामे करावे लागतात; मात्र मिळणारे मानधन कमी असूनही ते वेळेत मिळत नाही.

प्रवास भत्ता तरी कुठे मिळतो?

काही दिवसांपूर्वी काही तालुक्यात पोलिस पाटील भरती झाली आहे. पोलिस पाटील गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो; मात्र, त्याला प्रवास भत्त्यापासूनही वंचित राहावे लागते. भत्ताही नाही आणि मानधनही वेळेत मिळत नाही.

कोरोनातील कामाचेही मानधन मिळेना

कोरोना काळात पोलिस पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. अतिरिक्त केलेल्या कामाचे मानधन मिळेल, असे सांगितले होते; मात्र अद्यापही मानधन मिळालेले नाही. पोलिस पाटील अनेक गावांचा भार असला तरीही अल्प मोबदल्यात शासनाचे काम करत आहेत; मात्र त्यावर मानधनही वेळेत मिळत नाही.