काहींच्या हृदयाला छिद्र ; १४५ मुलांची झाली तपासणी
रत्नागिरी:- टू- डी इको तपासणीमध्ये लहान मुलांना हृदयाचे गंभीर आजार असल्याचे पुढे आले आहे. ० ते १८ वयोगटातील मुलांची गेल्या महिन्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाकडुन तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील १८ मुलांना हृदयाच्या समस्या जाणवल्या आहेत. काही मुलांच्या हृदयाला छिद्र आहे, शुद्ध-अशुद्ध रक्त मिसळणे, वाहिन्यांची क्षमता कमी होणे, अशा गंभीर समस्या आहेत. डॉ. श्रीकांत फाउंडडेशनमार्फत त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
लहान मुलांसाठी (वयोगट ० ते १८) मोफत २ डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वाडिया हॉस्पिटल, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ सप्टेंबरला जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत हे शिबिर घेण्यात आले. शिबिराला चांगल प्रतिसाद मिळाला. शिबिरात १४५ मुलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३१ विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन त्यांचा पाठपुरावा घेण्याची गरज आहे. १० मुलांवर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये १८ विद्यार्थ्यांना हृदयाच्या अनेक गंभीर समस्या दिसून आल्या आहेत. काही मुलांच्या हृदयामध्ये छिद्र आहे. यामुळे मुलांना दमा व अन्य त्रास होतो. हृदयाला चार कप्पे असतात. त्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त होते. परंतु हृदयाला छिद्र असेल तर शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळते. यामुळे मुलांना अनेक त्रास सुरू होतात. तर काही मुलांच्या नसा जाम झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. या मुलांवर डॉ श्रीकांत फाउंडेशन लक्ष ठेऊन आहे. लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी याला दुजोरा दिला.