रत्नागिरी:-जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील 846 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 790 सार्वजनिक स्त्रोत आहेत.
दरवर्षी पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. या सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणीसाठी ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामसेवक यांच्यामाफत सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा करण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमुने नेमून दिलेल्या प्रयोगशाळेत विहीत कालावधीत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येतात. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक घटकांच्या तपासणीत प्रामुख्याने पीएच, टोटल डिसॉल्व्ह सॉलिडस्, फ्लोराईड, नायट्रेट, आर्यन आदी घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.