रत्नागिरी:- शासनामध्ये एसटी विलिनिकरणासाठी सुरु असलेल्या बंदमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारी अजुनही ठाम आहेत. अन्य काही जिल्ह्यांप्रमाणे फूट पडलेली नाही. राजापूरमधून अवघ्या दोन फेर्या सोडण्यात आल्या असून जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचारी बंदात सहभागी आहेत.
राज्यात विविध ठिकाणी काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्याला अनुसरुन जिल्ह्यातील काही कर्मचारी कामावर रुजू होतील अशी शक्यता होती. राज्य सरकारमार्फतही एसटी कर्मचार्यांना बंद मागे घेण्यासाठी आवाहन केले जात आहे; परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचार्यांकडून त्याला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापूर आगारामधून नाटे मार्गावर दोन फेर्या शनिवारी (ता. 13) सोडण्यात आल्या. त्यामुळे एसटी सेवा सुरु होण्याची आशा दिवसभर मावळली. सलग पाचव्या दिवशीही जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचारी विविध आगारांच्या ठिकाणी बंदमध्ये सहभागी झालेले होते. जिल्हास्तरावर माळनाका येथील विभागिय कार्यालयापुढे आंदोलन सुरु होते. सर्वच कर्मचारी दिवसभर एकवटलेले होते. मनसेकडूनही एसटी संघटनेला पाठींबा दर्शविण्यात आलेला आहे. बंदमुळे पाच दिवसांमध्ये एसटी प्रशासनाचे अडीच कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. एसटीला पर्याय म्हणून खासगी वाहनांचा उपयोग केला जात आहे; परंतु तेथेही प्रवाशांची गैरसोय होतच आहे. राज्यात अनेक ठिकाणी वडापच्या गाड्या बसस्थानकात उभ्या करुन प्रवाशांची सोय केली जात होती. रत्नागिरीतील एकाही स्थानकामधून अशी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांना वडाप सुटणार्या ठिकाणी यावे लागत आहे. एसटी बंदचा सर्वधिक फटका ग्रामीण भागात बसला असून शहरांमधील मोठ्या बाजारपेठेंवर परिणाम झाला आहे. पन्नास टक्के ग्राहकांमध्ये घट झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात येत आहे.