रत्नागिरी:- कोरोनाची तपासणी करून केस कटींगसह दाढी करण्यासाठी जहाजावरील कामगार सलूनमध्ये गेेले आणि दुसर्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा सलून व ब्युटी पार्लरवर रत्नागिरी तालुक्यात निर्बंध आले असून मंगळवारी सायंकाळी उशीरा तालुक्यातील सर्व सलून पुन्हा लॉकडाऊन झाली आहेत.
जयगड येथील लावगण डॉकयार्डमध्ये ओएनजीसीचे एक जहाज दुरूस्तीसाठी आले होते. या जहाजावरील काही कर्मचार्यांचे कोरोनाचे नमुने घेऊन त्यांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र गणपतीपुळेसह जयगड येथील हॉटेलवर जावून हे कर्मचारी राहिले होते. गणपतीपुळे ते जयगड असा प्रवासदेखील त्यांनी केला होता. काही परिसरात त्यांचा वावरदेखील झाला होता तर काही कामगार गणपतीपुळे येथील एका सलूनमध्ये केस कटींग व दाढी करण्यासाठी गेले होते. जे सलूनमध्ये गेले होते त्यांचाच अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गणपतीपुळे व जयगड परिसरात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना सलून व ब्युटी पार्लर बंद करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरात शहर पोलिसंानी याबाबतचे आदेश व सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांना दिले. ग्रामीण भागातदेखील बंदी घालण्यात आली असून ही बंदी अनिश्चित काळासाठी आहे. नव्या आदेशामुळे तालुक्यातील ४०० ते ५०० सलून व तेवढ्याच संख्येने ब्युटी पार्लर पुन्हा लॉकडाऊन झाली आहेत.