रत्नागिरी:- जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील प्रमुख बसस्थानकांची परिस्थित अतिशय दयनीय आहे. सर्वच बसस्थानके खड्ड्यात गेली आहेत. प्रवाशांना हे अतिशय त्रासदायक ठरत आहे; परंतु आता या बसस्थानकांचा आणि प्रवाशांचा हा वनवास संपणार आहे. सर्व बस्थानके काँक्रिटची केली जाणार आहेत. त्यासाठी एमआयडीसी महामंडळाने एसटी महामंडळाला ५५ कोटीचा निधी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्वच एसटी बसस्थानकांच्या नूतनीकरणाची कामे रेंगाळली आहेत. अनेक ठिकाणी निधीवरून ठेकेदारांनी या कामांना हात घातलेला नाही. सर्वच कामे ठप्प आहेत. बांधा, वापरा, हस्तांतरित करा, अशी बीओटी तत्त्वावर या बसस्थानकांचे काम केले जाणार होते; परंतु हा निर्णय बदलून एसटी महामंडळामार्फत सर्व बसस्थानकांची कामे करण्याच निर्णय झाला. अनेक कामांची निविदाप्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली; परंतु आर्थिक बाबींवरून ठेकेदारांनी ही कामे रखडवली आहेत. याबाबत शासन आणि महामंडळ स्तरावर अनेक चर्चा, बैठका झाल्या; परंतु त्या निष्फळ ठरल्या. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेकेदारांना पैसे पुरवणे महामंडळाला शक्य झाले नाही. त्यामुळे रत्नागिरीच्या ठेकेदारावर कारवाई करून ठेकाच रद्द करण्यात आला. बहुतेक बसस्थानकांची हीच परिस्थिती आहे.
एसटी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने बसस्थानकांची परिस्थिती दयनीय आहे. स्थानक आवार आणि बाहेर पडण्याचे मार्ग खड्ड्यात गेले आहेत. शासनाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्यातून बसस्थानकांचा कायापालट होणारच आहे. जिल्ह्यातील ९ बसस्थानकांचा आवार आणि येण्या-जाण्याचे मार्गाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला एमआयडीसी महामंडळाकडून ५५ कोटी मिळाले आहेत. त्यातून काँक्रिटीकरणाची ही कामे होणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरकर यांनी याला दुजोरा दिला.