जिल्ह्यातील सर्व नळ पाणी पुरवठा योजनांचे होणार जीओ टॅगिंग

रत्नागिरी:- स्वच्छ जल से सुरक्षा अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नळ पाणी पुरवठा योजनांचे जीओ टॅगिंग करण्यात येणार आहे. तसेच नळ पाणी पुरवठा योजनेच्या स्रोतांची मान्सुन पश्चात कालावधीतील रासायनिक व जैविक तपासणी केली जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानांतर्गत सहभाग घेऊन स्वच्छ जल से सुरक्षा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

जलशक्ती मंत्रालयामार्फत जल जीवन सर्वेक्षणांतर्गत स्वच्छ जल से सुरक्षा अभियान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. याची अमंलबजावणी गुरुवारपासून सुरु झाली आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जीओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच पाणी नमुने तपासणी व त्यासाठीचे प्रशिक्षण इत्यादी बाबी अभियान स्वरुपात 1 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावयाच्या आहेत. हर घर जल या मोबाईलद्वारे अस्तित्वातील सर्व नळ पाणी पुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणा-या योजनांच्या प्रमुख स्रोतांचे मोबाईल अ‍ॅप द्वारे जीओ टॅगिंग पुर्ण केले जाईल. स्वच्छ जल से सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनेच्या स्रोतांची मान्सुन पश्चात कालावधीतील रासायनिक व जैविक तपासणी पुर्ण केली जाईल. अभियानांतर्गत ऋढघ किटद्वारे व त्याच्या वापरासाठी महिलांना प्रशिक्षीत करुन किटद्वारे नियमीत पाणी गुणवत्ता तपसाणी पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे तसेच शाळा व अंगणवाडी यांना पुरविण्यात आलेल्या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून, त्यांची प्रयोगशाळा तसेच रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.