जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांचे आजपासून कामबंद आंदोलन

कोणतीही चौकशी न करता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अटक केल्याने कामबंदचा निर्णय

रत्नागिरी:- अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील अति विभागाला आग लागून 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेली आहे, अशी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची धारणा आहे मात्र या प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता कार्यरत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांना अटक करण्यात आली. रुग्णालयांच्या ठिकाणी फायर ऑडिट करुन घेणे व नियमावली अनुपालन करणे वैद्यकीय अधिकार्‍यांची जबाबदारी असते मात्र यामध्ये अन्यायकारक रितीने कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आजपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी यांनी दिला आहे.

अहमदनगरमधील अतिदक्षता विभागात आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर कक्षातील  कार्यरत अधिपरिचारिका व कर्मचारी यांनी तेथून पळ न काढता, रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला असे प्रत्यक्षदर्शी रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील कबुली दिलेली आहे. असे असतानाही अन्यायकारक रितीने संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबन व अटक करण्यात आली. 1 ए 202 या संपूर्ण घटनेचा आम्ही वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका संघटनेकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी आणि परिचारिकांकडून निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबर रोजी कामबंद आंदोलनही होणार असल्याची कल्पना प्रशासनाला देण्यात आली आहे.