महामार्ग विभाग ; गणेशभक्तांचा प्रवास होणार सुखकर
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे. जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या ९० किलोमीटर अंतरातील खड्डे आणि मोठे पॅच यांचे काम करण्यासाठी जोरदार हालचाली महामार्ग विभागाकडून सुरू आहेत. पनवेल-इंदापूर विभागाप्रमाणेच रत्नागिरी विभागातही सी टी बी तंत्राद्वारे रस्ते दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. १५ ऑगस्टनंतर या तंत्राचा वापर करून महामार्ग दुरूस्ती सुरवात होणार आहे. महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
कोकणवासीयांना दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण वारंवार बैठका घेत असून महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेले मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दरवर्षीचा पावसाळा आणि त्यानंतर महामार्गाला पडणारे भले मोठे खड्डे आणि त्याची होणारी मलमपट्टी, ही आता परंपरा बनत चालली आहे. मात्र गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या मुंबईकर गणेश भक्तांना दिलासा मिळणार आहे. प्रवास करताना धक्के कमी बसतील अशी व्यवस्था शासनाकडून केली जात आहे. महामार्गावरील १८० किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्याचे आणि मोठे पॅच मारण्याचे काम येत्या १५ ऑगस्टनंतर सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम सातत्याने रखडत चालले आहे. मात्र त्यानंतर मंजूर झालेल्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले. कोकणवरच अन्याय का, असा सवाल करीत पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी बोंबाबोंब आंदोलनही केले. त्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर भागातील ९० किलोमीटर अंतरात असलेले खड्डे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या ९० किलोमीटर अंतरातील खड्डे आणि मोठे पॅच यांचे काम करण्यासाठी जोरदार हालचाली महामार्ग विभागाकडून सुरू झाल्या आहेत. पनवेल इंदापूर विभागाप्रमाणेच रत्नागिरी विभागातही सी टी बी तंत्राद्वारे रस्ता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. याबाबत महत्त्वाची बैठक झाल्याचे महामार्ग विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड लांजा या दोन टप्प्यातील ९० किलोमीटर महामार्गावर अस्तित्वात असलेल्या जुन्या मार्गाची स्थिती भयावह आहे. आरवली भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. निवळी ते हातखंबा भागात खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाली आहे. हातखंबा ते पालीपर्यंत रस्ता आणखीच खराब झाला आहे. पाली बाजारपेठेतील ५०० मीटर रस्ता पूर्ण बाद झालेला असून तेथे ५०० मीटर लांबीचा मोठा पॅच मारावा लागणार आहे.