रत्नागिरी:- जिल्हा महसूल प्रशासनातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक व मंडळ अधिकारी दर्जाच्या एकूण 119 कर्मचार्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्या असून, 5 जूनपर्यंत या कर्मचार्यांना कार्यमुक्त करावे असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या कालावधीनंतर चार वर्षांनी या बदल्या झाल्याने कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोना कालावधीनंतर मागील चार वर्ष महसूल कर्मचार्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. सन 2019मध्ये काही कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. परंतु त्यानंतर चार वर्ष कर्मचारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. 2022मध्ये बदल्यांना स्थगिती आल्याने या बदल्या रखडल्या होत्या. परंतु 2023मध्ये महसूल विभागाने कर्मचार्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे आदेश 31मे रोजी जारी केले. यामध्ये अव्वल कारकून वर्गातील 55, महसूल सहाय्यक वर्गातील 39 तर मंडल अधिकारी दर्जाचे 21 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.