रत्नागिरी:- गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे यासाठी आता प्रत्येक गावाचा जलआराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी भूजल पातळी व आवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गाव इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे पूर्ण झालेली गावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यापैकी उर्वरित गावांपैकी अवर्षणप्रवण जिल्ह्यातील गावे, भूजल संरक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे, अपूर्ण पाणलोट असलेल्या गावांची निवड प्राधान्यक्रमाने जलयुक्त योजनेसाठी केली जाणार आहे.
गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे आदी कामे केली जाणार आहेत. तसेच साठवण्यासाठी शेततळी उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण करून पाणी साठवणे, सुक्ष्मसिंचन मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्वाने सिंचन व्यवस्था करणे, पाणी साठवलेल्या प्रकल्पांवर पाणी वापर संस्थांप्रमाणे शेतकर्यांच्या सहभागातून सिंचन व्यवस्थापन करणे आदी कामांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खूप मदत होणार आहे.