पाचपटाच्या 260 शाळा; प्राथमिक चर्चा पूर्ण
रत्नागिरी:- पाचपेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा नुकतीच झाली. जिल्ह्यात 260 शाळा असून सुमारे साडेसहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन दिवसांपुर्वी शिक्षण सभापतींच्या दालनात झालेल्या बैठकीत शिक्षक संघटनांनी सरसकट शाळा समायोजनास नकार दर्शवला. भौगिलीक परिस्थितीचा विचार करुनच पुढील निर्णय घ्या अशी सुचना केली.
कमी पटाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होत नाही. त्यामुळे शासनाने वीस पटाच्या शाळांचे अन्य शाळेत समायोजन करा अशा सुचना दिल्या. त्याला तिन वर्षांपुर्वी विरोध झाला होता. एक विद्यार्थी आणि शुन्य पट झालेल्या शंभरहून अधिक शाळा बंद झाल्या. सध्या कोरोनामुळे समायोजनाचा विषय मागे पडला होता. जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक शाळा असून त्यात 72 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. भविष्यात शाळा सुरु होणार असल्यामुळे समायोजन प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. शिक्षक संघटनांकडून विरोध होऊ नये यासाठी प्राथमिक बैठक शुक्रवारी झाली.
मोकळा श्वास या उपक्रमांतर्गत समायोजन करण्याविषयी शिक्षण विभागाकडून मुद्दे मांडण्यता आले. त्याचे फायदे काय आहेत, हे सांगण्यात आले. मात्र शिक्षण संघटनांच्या प्रतिनिधींनी भौगोलिक परिस्थितीचे कारण देत सरसकट समायोजनास नकार दर्शवला. दोन शाळांमधील अंतर 500 मीटर कमी किंवा एकाच गावात असलेल्या कमी पटाच्या शाळांच्या समायोजन करा अशी सुचनाही केली. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांना हे समायोजन अडचणीचे ठरते. त्यात विद्यार्थी शाळाबाह्य होऊ शकतात. जास्त अंतर असलेल्या शाळांचा विचार करु नये, अशी सुचना यावेळी करण्यात आली. तसेच शिक्षण सभापतींनी सुचना करताना लोकांना पटणार नाही असा विषय करु नका असे सांगितले. उद्देश चांगला असला तरीही तो लोकांना त्रासदायक होणार नाही याकडे लक्ष दिले पाहीजे.