रत्नागिरी:- घाटकोपर- मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे कुठलीही दुर्घटना होवू नये तसेच कोणतीही जिवित वा वित्त हानी होवू नये, यासाठी जिल्ह्यातील होर्डिंग व बॅनरबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आढावा घेतला. अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज निष्कासित करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकणी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सर्व मुख्याधिकारी, सर्व तहसिलदार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. सिंह यांनी बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे कुठलीही दुर्घटना होवू नये व त्याकारणाने कोणतीही जिवित वा वित्त हानी होवू नये या करिता सर्व प्रशासकीय यंत्रणाच्या विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. सर्व कार्यालयीन विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, तसेच धोकादायक स्थितीत असलेले होर्डिंग्ज यांचे तात्काळ सर्व्हेक्षण करून अनधिकृत व धोकादायक होर्डिंग बद्दल पुढील ३ दिवसांची नोटीस देवून निष्कासित करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या कार्यक्षेत्रातील परवानगी दिलेले सर्व होर्डिंग्ज व बॅनर्स यांचे स्ट्रक्चरल ऑडिट १५ दिवसांमध्ये करण्याच्या सूचनाही दिल्या. सर्व नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग व बॅनर उभारले जाणार नाहीत, याची काळजी मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये होर्डिंग्ज व बॅनरच्या दरपत्रकामध्ये एकसमानता आणण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.
.