जिल्ह्यातील खाड्यांमध्ये बॅक वॉटर टुरिझम उपक्रम

दीपक केसरकर; सिंधुरत्नच्या अंमलबजवाणीमुळे गुणात्मक फरत

रत्नागिरी:-सिंधुरत्न योजनेची व्याप्ती मोठी असून अकरा विभागांचा यामध्ये समावेश आहे. अधिकारी वर्गांनी योजनेची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दोन्ही जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढुन विकासामध्ये गुणात्मक फरक नक्की दिसेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास गोव्याप्रमाणे होत असला तरी रत्नागिरीचा विकास सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे होण्याची गरज आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदी भागातील पर्यटकांना आपण रत्नागिरीत काय देऊ शकतो, याचा विचार करून जिल्ह्यातील खाड्यांमध्ये बॅक वॉटर टुरिझम वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी हाऊस बोटीसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. केसरकर म्हणाले, सिंधुरत्न योजना दोन्ही जिल्ह्यांमध्ये क्रांती घडवु शकते, एवढी या योजनेमध्ये ताकद आहे. योजनेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी, यासाठी काल सर्व अधिकारी वर्गांशी चर्चा केली. आपली जबाबदारी वाढली असून योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना

घेता यावा, यासाठी सर्वांनी मी या योजनेवर वैयक्तीक लक्ष देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क़ॉंग्रेसच्या मंत्र्यांचे हे स्वप्न आहे. सेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाला आता देण्याची वेळ आली असून फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष विकास कामे सुरू आहेत. चांदा ते बांदा ही योजना यापूर्वी सुरू होती, या योजनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ९४ टक्के वाढले आहे. परंतु कालांतराने

ही योजना बंद झाली आणि २४० कोटी रुपये परत गेले. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्ही सिंधुरत्न ही योजना आणली आहे. दर वर्षाला १०० कोटी या प्रमाणे ३ वर्षाला ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. पर्यटन, फलोत्पादन, मासेमारी, वन, पशुसंवर्धन, कृषी अशा ११ क्षेत्रांसाठी ही योजना आहे.

जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पन्न वाढावे, यासाठीही आमचा प्रयत्न आहे. नवीन बियाने, अवजारे, आदीचा योजनातून लाभ घेता येणार आहे. आंबा, काजूसाठीही अनेक योजना आहे. प्रक्रिया उद्योग घेता येणार आहे, आंबा संशोधन केंद्र, इन्सुलेटर व्हॅनसाठी ७५ टक्के अनुदान आहे. मच्छीमारांना जाळे,  बंदर विकास, आदीसाठी अनुदान देता येणार आहे. अॅग्रो, इको टुरिझमचाही योजनेमध्ये समावेश आहे.

दरवर्षी १४ लाख पर्यटक सिंधुदुर्गमध्ये तर ५ लाख पर्यटक रत्नागिरीत येतात. सिंधुदु्र्गचा गोव्या प्रमाणे पर्यटन विकास झाला पाहिजे तर रत्नागिरीचा सिंधुदुर्ग प्रमाणे व्हावा, यासाठी काही योजना आखण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्ये बॅक वॉटर टुरिझम वाढावे यासाठी आमचे प्रयत्न असून त्यावर अभ्यास सुरू झाला आहे. हाऊस बोटीसह अन्य सुविधा त्यासाठी दिल्या जाणार आहेत. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील पर्यटक रत्नागिरीकडे वळावा यासाठी हा प्रयत्न आहे. तसेज दर्जेदार निवासन्याहरी योजना लाबली जाणार आहे. पर्यटनातून रोजगार आणि रोजगारातून दरडोई उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.