रत्नागिरी:- समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा शेवटच्या स्तरापर्यंत मिळवून देण्याकरिता आशा स्वयंसेविका काम करत आहेत. आशा स्वयंसेविका समाजात सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी व त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्याकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱया जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरवण्यात आले.
जिल्हयातील आशा स्वयंसेविका यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबाबत पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषदेच्या हिंदुहदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सभागृहामध्ये 11 मार्च 2024 रोजी संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार होते. पुरस्कार कार्यक्रमावेळी परिक्षीत यादव अति मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, राहुल देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, श्रीकांत हावळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण, उत्तम सुर्वे जिल्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्रीम. मयुरी पाटील कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा उपस्थित होते.
आशा स्वयंसेविका योजना राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हास्तरावर सुरु असून आरोग्य विषयक कार्यक्रमांची माहिती समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा शेवटच्या स्तरापर्यंत मिळवून देण्याकरिता आशा स्वयंसेविका काम करत आहेत. आशा स्वयंसेविका यांना एकुण 56 कामांवर आधारीत मोबदला अदा करण्यात येतो. आशा स्वयंसेविका समाजात सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी व त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्याकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱया आशा स्वयंसेविकांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिल्हास्तरावर देण्यात येतो.
आपल्या जिल्हयाचे ग्रामिण भागातील आशा स्वयंसेविका नियुक्तीचे उद्दीष्ट हे 1343 असुन 1333 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. शहरी भागामध्ये चिपळुण नगरपरिषदमध्ये 25 पैकी 25 व रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये 33 पैकी 33 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या कार्यक्रमामध्ये जिल्हयातुन सर्वोकृष्ट काम करणाऱया आशा स्वयंसेविकांचा गौरवपत्र देवुन सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक श्रीम. मेघा महेश नेवरेकर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चिपळुण तालुका चिपळुण यांना रुपये 25,000/- व्दितीय क्रमांक श्रीम.वैशाली विश्वनाथ कुडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्र केळशी तालुका दापोली यांना रुपये 15,000/- व तृतीय क्रमांक श्रीम. सुमित्रा सुरेश साळवी, प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे तालुका खेड यांना रुपये 5,000/- प्रशस्तीपत्रक व शिल्ड देवुन सन्मानीत करण्यात आले.