जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर

11 रूग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची जवळजवळ सर्वच पदे

रत्नागिरी:- तळकोकणातील प्रगतशील असलेला व शिक्षणाचे हब होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः व्हेंटीलेटरवर गेली आहे. जिल्हा रूग्णालयासह 11 उपजिल्हा, ग्रामीण, रूग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची जवळजवळ सर्वच पदे रिक्त आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात एकही तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय रूग्णालयात गेल्यावर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी येथील सत्ताधारी निवडणुकीमध्ये रममाण झाले आहेत. परंतु जनतेच्या आवश्यक आरोग्य सुविधेकडे लक्ष द्यायला मंत्री, आमदार, खासदार यांना वेळ नसल्यामुळे उपचाराअभावीच रूग्णांचे जीव जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता शासकीय रूग्णालयातील उपचारांवर अवलंबून असते. खाजगी रूग्णालयात जाऊन उपचार घेणे त्यांना शक्य नसल्याने शासकीय रूग्णालय हाच एकमेव आधार त्यांच्यासाठी असतो. परंतु जिल्हा शासकीय रूग्णालयासह 11 उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयात 30 पैकी केवळ पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेली आहेत. उर्वरित 25 पदे रिक्त राहिली आहेत.
जिल्हा शासकीय रूग्णालयात वर्ग-1ची एकूण 19 पदे मंजूर आहेत, त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी, शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकारी ही चारच पदे भरलेली असून उर्वरित विषय तज्ञांची सर्व पदे रिक्त आहेत. त्यामध्ये प्राधान्याने स्त्री रोग, प्रसुतीतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग चिकित्सक, बधीरकरण शास्त्रज्ञ, क्ष-किरण तज्ञ, मनोविकृती चिकित्सक, नेत्रशल्य चिकित्सक अशा 15 रिक्त पदांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 11 उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयात प्रत्येकी एक एमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी राजापूर वगळता मंडणगड, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, लांजा, रायपाटण, पाली, कळंबणी, दापोली, कामथे येथील एमएसची पदे रिक्त आहेत. केवळ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रूग्णालयांचा कारभार हाकला जात आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात वर्ग-2 ची 30 पदे मंजूर आहेत, त्यापैकी केवळ 6 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित 24 पदे रिक्त आहेत. बालरोग विभागात तीन पैकी तिन्ही पदे रिक्त आहेत. स्त्री रोग तज्ञ विभागात तिन्हीपैकी तिन्ही पदे रिक्त असून सध्या डॉ. विनोद सांगवीकर हे उसनवारीवर जिल्हा रूग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनाही रायगड येथून परत बोलवण्यात आले आहे. परंतु अद्याप त्यांना सोडण्यात आलेले नाही. त्यांना सोडण्यात आल्यास पुन्हा एकदा प्रसुती विभागाला कुलूप ठोकण्याची वेळ जिल्हा रूग्णालयावर येणार आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयाचा कार्यभार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून काढून घेत तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयावर अधिष्ठांतांचे नियंत्रण आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे उपचाराचे तीनतेरा वाजलेले असतानाच अधिष्ठाता जिल्हा रूग्णालयाकडे लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे. भूलतज्ञ नसल्यामुळे अनेक रूग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु अधिष्ठातांना जिल्हा रूग्णालयाचा राऊंड घ्यायला वेळ मिळत नाही का? असा प्रश्न रूग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

निवडणुका संपल्या असतील तर आमच्याकडे लक्ष द्या!
तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचाराचे तीनतेरा वाजले आहेत. अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टर केवळ राऊंडसाठी येतात. कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णांचे हकनाक बळी जात आहेत. तर इतर वॉर्डमध्येही तीच स्थिती आहे. तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे अचूक निदान होत नाही. त्यामुळे परिपूर्ण उपचार रूग्णांना मिळत नाही. केवळ टोलेजंगी इमारतीत रूग्णांची गर्दी असून डॉक्टरांची वानवा आहे. निवडणुकीत व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींनी आता निवडणुका संपल्या असतील तर आमच्याकडे लक्ष द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया रूग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत आता तरी रूग्णालयाकडे लक्ष देणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.