रत्नागिरी:- जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये साखरीनाटेपासून पुढे देवगडपर्यंत परप्रांतीय ट्रॉलींगवाल्यांनी धुडगुस घातला आहे. अतिवेगवान आणि अत्याधुनिक बनावटींच्या नौकांमुळे त्यांचा पाठलाग करणे स्थानिक प्रशासनालाही शक्य होत नाही. समुद्रात परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पर्ससिननेटद्वारे मासेमारी करणार्यांना बारा नॉटीकल मैलात राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर केंद्राच्या हद्दीतही ते मासेमारी करु शकत नाही असाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्राच्या हद्दीत जाऊन मासेमारी करणार्यांची गैरसोय होऊ लागली आहे. या विरोधात पर्ससिननेट मच्छीमारांनी आंदोलन केले आहे. रत्नागिरी, राजापूरातील अनेक पर्ससिननेटधारक मत्स्य विभागाच्या कार्यालयापुढे आंदोलन करत आहेत. एकीकडे शासनाकडून पर्ससिननेटधारकांविरोधात कारवाई करण्याचा पवित्रा घेतला असतानाच रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत 18 वावामध्ये बुधवारी (ता. 5) सुमारे चाळीसहून अधिक परप्रांतीय ट्रॉलर्स् मासेमारी करत होते. त्या नौकांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये 18 वावात मासेमारी करत असलेल्या परप्रांतीय नौका दाखवण्यात आल्या आहेत. साखरीनाटेपासून पुढे देवगड पट्ट्यात त्या नौका मासेमारी करत होत्या. त्या हायस्पीड नौका असून तीन नॉटीकल मैल वेगाने चालत असतानाही मासेमारी करण्याची त्यांची क्षमता असते. त्यांचा पाठलाग करणेही स्थानिक नौकांना शक्य होत नाही. ते मच्छीमार झुंडीने हद्दीत दाखल होतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यास त्या पळून जातात असा अनुभव मच्छीमारांकडून व्यक्त केला जात आहे.
कोकण किनारपट्टी ही मासे सापडण्याचा झोन आहे. त्यामुळे परप्रांतीय नौका याठिकाणी दाखल होतात. परिणामी स्थानिक मच्छीमारांना मात्र मासळी मिळत नाही. सध्या बांगडा, म्हाकुळ, सुरमई यासारखी मासळी मारत ते मच्छीमार पुढे निघून जातात. मत्स्य विभागाकडे गस्तीची एकच नौका आहे. त्यामुळे 167 किलोमीटरच्या जिल्ह्याच्या किनारी भागात लक्ष ठेवणे अशक्य होते. परंतु अतिक्रमण करत असलेल्या नौकांची माहिती मिळाल्यास सहाय्यक मत्स्य विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. अनेकवेळा मत्स्य विभागाची गस्तीनौका येईपर्यंत परप्रांतीय नौका पळून जातात. यावर लक्ष ठेवण्यासाठी जादा नौकांची मागणी केली जात आहे.