चिपळूण:- तालुक्यातील सती, चिंचघरी, अनारी, टेरव आदी परिसरात शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. टेरव येथे वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले आहेत. दापोलीतही शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला होता. येथे सायंकाळी 4 च्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार झाले होते.
शुक्रवारी सायंकाळी राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. गुरूवारी सकाळपासून कडकडीत ऊन पडलेले असताना राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले व काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे, कनकाडी गावाला शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका बसला. सोसाट्याया वाऱ्यामुळे घरावरील पत्रे व कौले उडणे, घरावर झाड कोसळणे अशा घटना घडल्या. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.