नूतन पोलीस आधिक्षक डॉ. गर्ग यांचा निर्धार
रत्नागिरी:- १९९३ नंतर २००८ साली घडलेली घटना व त्यानंतर सागरी सुरक्षेबाबत कडक पावले उचलण्यात आली. जिल्ह्याची सागरी सुरक्षा हा माझ्यासाठी मोठा विषय आहे. सागरी सुरक्षेवर विशेष भर देणार असल्याचे नवनिर्वाचित पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले.२१ ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
रत्नागिरीतदेखील हा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालयातील कक्षात झालेल्या पत्रकार संवादामध्ये डॉ. गर्ग यांनी सागरी सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. हा विषय माझ्यासाठी मोठा असल्याचेेदेखील ते म्हणाले. १९९३ व त्यापाठोपाठ २००८ साली घडलेली घटना व त्यानंतर सर्वच राज्यांत सागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात आली.
सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी यासाठी सागरी सुरक्षा दल तसेच कम्युनिटी पोलीसही आणि मच्छिमारांची मदत घेऊन सागरी सुरक्षा अधिक मजबूतीने राबवणार असल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले. जिल्हा पोलीस दलात सागरी सुरक्षेसाठी ९ स्पीडबोटी आहेत. त्यातील १ बोट नादुरुस्त आहे. ६ बोटी सध्या कार्यान्वित असून पुढील १५ दिवसांत अन्य दोन बोटी कार्यान्वित होतील अशी माहिती डॉ. गर्ग यांनी यावेळी दिली.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तत्काळ मार्गी लागावेत आणि पोलीस व जनता यांच्यात दुरावा राहू नये यासाठी ई-दरबारा सोबतच पोलीस स्थानकानुसार जनरल दरबार घेणार असल्याचे डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले. मंडणगडच्या जनतेला रत्नागिरीत येणे शक्य नाही त्यामुळे पोलीस स्थानकानुसार नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.