जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार होण्यापूर्वीच लांजात धावला पहिला टँकर

रत्नागिरी:- जिल्ह्याचा टंचाई आराखडा अजुनही तयार झालेला नसला तरीही लांजा तालुक्यातील पोचरी भोजेवाडी येथे पहिला टँकर धावला. गतवर्षीही लांजा तालुक्यातच पहिल्या टँकरची नोंद झाली होती.

जिल्ह्यात दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात टंचाईला सुरवात होते. यंदा उशिरापर्यंत पाऊस चालू होता. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपाठोपाठ जानेवारी महिन्यातही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे यंदा पाणी पातळी स्थिर राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. दरवर्षी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून डिसेंबर महिन्यात टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा संगमेश्‍वर तालुका वगळता अन्य आठ तालुक्यातून टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेला नाही. तालुक्यांकडून आराखडा आला की एकत्रित जिल्ह्याचा आराखडा बनवला जातो. तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवतात. तालुक्याचा आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते. त्यामध्ये तो मंजूर करण्यात येतो. जिल्ह्याचा आराखडा झालेला नसतानाही लांजा तालुक्यात पहिला टँकर धावण्यास सुरवात झाली आहे. पोचरी-भोजेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी टँकरने पाणी पुरवठा चालु झाला आहे. गावाच्या एका बाजूला असलेल्या या वाडीला पाणी पुरवठा करणारी विहीरी सुखल्यामुळे टँकरची मागणी ग्रामस्थांनी केल्याचे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. अन्य तालुक्यातून टँकरसाठी एकही मागणी आलेली नाही.