रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्टपासून सरकारी आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत केली आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांचा ओघ वाढत आहे. धक्कादायक म्हणजे रत्नागिरी जिल्हा शासकीयपणे रुग्णालयात दररोज सर्वसाधारणपणे 200 ते 250 ओपीडी असते. मात्र, गेला महिनाभर 700 ते 800 रुग्णांची ओपीडी होत असून रुग्णसेवा देताना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची अक्षरश: दमछाक होत आहे. इतकेच नव्हे तर रुग्णांना बेड उपलब्ध करुन देतानाही रुग्णालयाची मोठी कसरत होत आहे. तरीही रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी संपूर्ण टीम दिवसरात्र काम करत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आधीच डॉक्टर आणि कर्मचार्यांची संख्या कमी, त्यात चार पटीने कामाचा ताण वाढला असल्याने काही रुग्णांना उपचार देताना नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यात वादही होत आहेत. जितकं शक्य आहे त्यापलीकडे जावून आम्ही रुग्ण सेवा बजावत असतानाही नातेवाईकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. मुळात कर्मचारी संख्या कमी, दररोज अॅडमिट होणार्या रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. अशातच कामाचाही ताण वाढल्याने वैद्यकीय अधिकारी तणावाखाली असूनही रुग्ण सेवा बजावत असल्याच्या प्रतिक्रिया परिचारिकांमधून व्यक्त करण्यात आली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सगळ्याच आजारांचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अगदी मंडणगडच्या टोकापासून ते रत्नागिरी शहरातील रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे.