जिल्हा रुग्णालयात अखेर भूलतज्ज्ञ रुजू

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली अनेक वर्षे कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ नव्हते. मात्र, आता डॉ. भालाजी कदम आणि डॉ. विनोद चव्हाण हे दोन भूल तज्ज्ञ रुजू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आजही अनेक पदे रिक्त आहेत. तरीही आहे त्या मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी करत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रक्रिया पार पडत असतात. बर्‍याच वेळा भूलतज्ज्ञ नाही म्हणून खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत होती. मात्र, आता एकाचवेळी 2 भूलतज्ज्ञ रुजू झाल्याने रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे.

डॉ. भालाजी कदम आणि डॉ. विनोद चव्हाण यांनी प्रत्यक्षात कामावर हजेरी लावली असून, यापुढे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.