रत्नागिरी:- दोन हजार रु.च्या आर्थिक व्यवहारातून तरुणाला बेदम मारहाण करणार्या संशयित पाच जणांपैकी तिघे सोमवारी न्यायालयात हजर झाले. त्यांना न्यायालयाने २८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अन्य दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अभिषेक पांचाळ, अमेय मसुरकर आशिष सावंत अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर सुमित शिवलकर आणि हर्षद धूळप
या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.रविवार 18 जून रोजी रात्री अक्षय प्रकाश नाखरेकर (31रा.गुढेवठार) या तरुणावर घुडेवठार आणि जिल्हा रुग्णालयात हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अक्षय नाखरेकरने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या पाच संशयितांसह इतर पाच ते सहा जणांवर
भा.द.वि.क.143, 147, 148, 149, 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सर्व कलमे जामिनपात्र असल्याने संशयितांनी गुरुवार दि. 22 जून रोजी परस्पर न्यायालयात हजर होण्याचे ठरवले होते.गुरुवारी सकाळ पासूनच संशयित न्यायालयात हजर होण्यासाठी आले होते.परंतू याची कुणकुण शहर पोलिसांना लागताच त्यांनी न्यायालयाच्या आवारात फिल्डिंग लावल्याने संशयितांनी न्यायालयात हजर न होताच तेथून काढता पाय घेतला होता.मात्र,सोमवारी या पाच संशयितांपैकी तिघेजण परस्पर न्यायालयात हजर होण्यात यशस्वी झाले तर अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भारत वनवे करत आहेत.