अग्निशमन यंत्रणा कालबाह्य; ऑडिट करण्याची गरज
रत्नागिरी:- भंडारा येथील सामान्य शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिटमधील आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणांचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात फायर ऑडिटवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही अग्निशमन सिलिंडरची मुदत संपली असून ते तातडीने बदलणे आवश्यचक असल्याची माहिती पुढे आली आहे.
भंडारा येथे सामान्य शासकीय रुग्णालयात अतिदक्षता नवजात शिशु केअर सेंटरला भीषण आग लागली. त्यात सेंटरमधील नवजात बालकांचा मृत्यू झाला. या कक्षामध्ये कमी वजनाची बालके, नाजूक प्रकृती असलेल्या बालकांवर लक्ष ठेवले जाते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातही अतिदक्षता नवजात शिशु केअर सेंटर कार्यरत आहेत. यामध्ये 15 नवजात बालके ठेवण्याची क्षमता आहे. सध्या दहा बालके उपचाराखाली आहेत. सिव्हीलमधील इमारतीच्या दुसर्या मजल्यावर हा विभाग कार्यरत आहे. या विभागाकडे जाण्यासाठी एकाच जिन्याचा मार्ग आहे. अतिदक्षता विभागात दोन सिलिंडर आहेत; मात्र वॉर्डची रचना पाहता तिथे सिलेंडरचीही कमतरता आहे. महिला प्रसूती विभागातही अग्निरोधक सिलेंडरचा तुटवडा असून तेथील काही सिलेंडरची मुदतही संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी नव्याने सिलिंडर बसविण्याची आवश्यक आहे. त्यामुळे या भागचे फायर ऑडिट करावे लागणार असून सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आहे. भंडारा येथील घटनेनंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सक्षम करावी लागणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात असे गंभीर प्रसंग उद्भवू नये यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेतली जात आहे. गतवर्षी रुग्णालयात मॉकड्रीलही घेण्यात आले होते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीनंतर आवश्यक यंत्रणेचा तातडीने आढावा घेतला जात आहे. तातडीने उपाययोजनांसाठी पाठपुरावा केला जाईल, असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.