जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर! तब्बल 66 पदे रिक्त

रत्नागिरी:- गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था पुरेशा मनुष्य बळाअभावी अत्यंत दयनीय झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये मिळून तब्बल 66 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. नर्सिंग, कार्यालयीन, वर्ग 3, वर्ग ड ची जवळपास पावणे तीनशे पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांवर मोठा ताण पडत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना अन्य जिल्ह्यात औषध उपचारासाठी पाठवण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले असल्याने रुग्ण व नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

मागील अनेक वर्षापासून रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना डॉक्टरांचा प्रश्न भेडसावत आहेत. त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांची रिक्त पदांमुळेही कामे खोळंबण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाने यात विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात 30 पैकी 11 डॉक्टरांची पदे रिक्त असून यात जिल्हा रुग्णालयात तीन मंजूर पदांपैकी एकही बालरुग्ण नाही. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांचीही तीन पैकी दोन पदे रिक्त आहेत. भूलतज्ज्ञ 1 असून क्ष किरण तज्ज्ञांचे पदही रिक्त आहे.
जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची स्थिती बिकट असून 91 पैकी 44 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. विशेषत: पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली येथे ग्रामीण रुग्णालय सुरु केले. परंतु याठिकाणी मंजूर असलेली तीनही डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्याठिकाणाहून रुग्णांना रुग्णवाहिकेत भरून जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे काम कर्मचारी करीत असल्याची चर्चाही जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. गट ड अंतर्गत येणार्‍या 32 प्रकारची 283 पदे मंजूर असून त्यातील 134 पदे रिक्त आहेत. जवळपास निम्मी पदे रिक्त असल्याने त्याचाही परिणाम कामकाजावर होत आहे. जिल्ह्यात नर्सिंग कर्मचार्‍यांची स्थिती बरी असली तरी रिक्तपदेही भरण्याची मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालयात 131 पदे मंजूर असून त्यातील 32 पदे रिक्त आहेत. तर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये मिळून 258 नर्सिंगची पदे मंजूर असून त्यातील 57 पदे रिक्त आहेत.