कामावर मोठा परिणाम; दस्तावेजासाठी नागरिकांना हेलपाटे
रत्नागिरी:- जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचा डोलारा निम्म्या कर्मचाऱ्यांवरच आहे. एकूण मंजूर २०७ कर्मचाऱ्यांपैकी फक्त १०७ कर्मचारी कार्यरत आहेत. विभागातील ५० टक्के कार्यभार हा रिक्त आहे. याचा दैनंदिन कामावर मोठा परिणाम होतो. या रिक्त पदांमुळे इथे येणाऱ्या सामान्य नागरिकाला एखाद्या दस्तावेजासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
जिल्ह्यात आजही एखादा भूमी अभिलेखचा दस्तावेज अथवा नकाशा हवा असल्यास नागरिकांना या कार्यालयाच्या खेपा माराव्या लागत आहेत. काही ठिकाणचे नकाशे गहाळ झाल्यामुळे आता नवीन नकाशे करून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिक, गरीब शेतकरी यांचे मात्र नाहक हाल होत आहेत. भारत सरकारच्या स्वामित्व योजनेतील मिळकत पत्रक मिळणे तर साधे जमिनींचे नकाशे तरी सुस्थितीत मिळावेत, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र हे सर्व दस्तऐवज जतन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात सध्या २०७ मंजूर पदापैकी फक्त १०७ पद कार्यरत आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी-विक्रीकरिता लागणाऱ्या संबंधित जागांचे नकाशे व इतर दस्तऐवजासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असला तरी जनतेच्या सेवेसाठी ते जेवढे शक्य तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर ही रिक्त पदे भरावी, अशी सर्वांचीच मागणी आहे.