रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.
सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे हे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रारूप मतदार याद्या 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. बाजार समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर मतदार याद्या बुधवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांवरील दावे, आक्षेप 10 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. दाखल झालेले दावे, आक्षेप विचारात घेऊन 1 डिसेंबरला त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. याचवेळी मतदार यादी दुरूस्त करण्यात येणार आहे. 6 डिसेंबरला बाजार समितीच्या मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शासकीय, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी निवडणूकविषयक कामकाज बंद राहील. संबंधितांनी आपले दावे, आक्षेप नेमून दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेेळेवर दाखल करावे असे आवाहन डॉ.सोपान शिंदे यांनी केले आहे.