जिल्हा बँक निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी उरले पाच दिवस 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सहकार पॅनेलचे प्रमुख बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्यासह तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सलग शासकीय सुट्टीमुळे सोमवारपासून (ता. १८) पुन्हा अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. अंतिम मुदत २२ ऑक्टोबर आहे.

निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच सर्वपक्षीय सहकार पॅनलने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. एकवीस जागांसाठी होणारी निवडणुक बिनविरोध होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. सहकार पॅनलनेमध्ये सहभागी झालेल्या भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला ३ तर शिवसेनेला ६ जागा देण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी विविध कार्यकारी संस्था चिपळूणमधून अर्ज दाखल केला. त्यांचेच चार अर्ज आहेत. तसेच महीलांमधून नेहा माने तर कुक्कुटपालन गटातून अमजद बोरकर यांनी अर्ज भरले आहेत. त्यानंतर शासकीय सुट्ट्या आल्याने पुढील कार्यवाही सोमवारपासून सुरु होणार आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सुधीर कांबळे हे काम पाहणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदारांची यादी निश्‍चित झाली आहे. जिल्ह्यात ९९५ मतदार आहेत. त्यात कृषी पतसंस्था मतदारसंघात ३२१, दुग्ध व पशुपैदासमध्ये ३६, कुक्कुटपालन गटात २५, कुषी पणन व शेती माल प्रक्रिया गटात १७६, नागरी सहकारी पतसंस्था व ग्रामीण बिगरेशेती गटात १२६, गृहनिर्माण मधून ११७, मजूर संस्था गटातून १००, औद्योगिक वाहतूक गटातू ९४ मतदान आहेत.