जिल्हा बँक निवडणुकीसाठी चिन्हवाटप; सहकार पॅनेलच्या उमेदवारांना ‘कपबशी’

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या सातही उमेदवारांना कपबशी निशाणी मिळाली आहे. निशाणी वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सोपान शिंदे यांनी पूर्ण केली.

रत्नागिरी तालुका मतदारसंघातून गजानन कमलाकर पाटील यांना कपबशी, प्रल्हाद महादेव शेट्ये यांना मोटारगाडी, लांजा तालुका मतदारसंघातून आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना कपबशी, महेश रवींद्र खामकर यांना नारळ, गुहागर तालुका मतदारसंघातून अनिल विठ्ठल जोशी यांना कपबशी, चंद्रकांत धोंडू बाईत यांना अंगठी, जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून गणेश यशवंत लाखण यांना कपबशी, अजित रमेश यशवंतराव यांना नारळ, विमुक्त जाती मतदारसंघातून सुरेश मारूती कांबळे यांना कपबशी, सचिन चंद्रकांत बाईत यांना अंगठी, नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून संजय राजाराम रेडीज यांना कपबशी, सुजित भागोजी झिमण यांना ढाल-तलवार, मजूर मतदारसंघातून दिनकर गणपत मोहिते यांना कपबशी, राकेश श्रीपत जाधव यांना नारळ निशाणी देण्यात आली आहे. सहकारच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गुरूवारी सात जागांवरील 14 उमेदवारांना निशाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या 14 उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार पॅनेलचे 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.