जिल्हा बँक निवडणुकीसाठी 19 उमेदवारांचे 29 अर्ज दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी 29 अर्ज दाखल केले आहेत. 22 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहकार पॅनेलमधील निश्‍चित केलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरवात केली आहे. सर्वपक्षीय पॅनलेची घोषणा डॉ. तानाजी चोरगे यांनी केली होती. 

चिपळूण तालुका मतदारसंघातून अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, खेड तालुका मतदारसंघातून उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, कृषी पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून आमदार शेखर निकम, सुनितकुमार आमगौंडा पाटील, मंडणगड तालुका मतदारसंघातून रमेश दळवी, दापोली मतदारसंघातून सुधीर कालेकर, संगमेश्‍वर मतदारसंघातून राजेंद्र सुर्वे, रत्नागिरी मतदारसंघातून गजानन पाटील, लांजा मतदारसंघातून आदेश आंबोळकर, राजापूर मतदारसंघातून महादेव सप्रे, मागासवर्गीय मतदारसंघातून जयवंत जालगावकर, विशेष मागास मतदारसंघातून सुरेश कांबळे, इतर मागासवर्ग मतदारसंघातून रामचंद्र गराटे, महिला राखीवमधून सौ.नेहा माने, सौ.दिशा दाभोळकर, दुग्ध मतदारसंघातून गणेश लाखण, नागरी पतसंस्था मतदारसंघातून संजय रेडीज, औद्योगिक मतदारसंघातून मधुकर टिळेकर, गृहनिर्माणमधून ड.दीपक पटवर्धन यांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केले आहेत.

विरोधी पॅनलकडे लक्ष?

चिपळूणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते यांच्यापाठोपाठ गुहागरमधील दोघांनी सहकार पॅनेलच्या निवडीवर तोंडसुख घेतले आहे. भाजपच्या एका गटाने जागा वाटप अमान्य असल्याचे जाहीर केले होते. अंतिम मुदतीपर्यंत प्रत्यक्षात सर्वपक्षीय सहकार पॅनेलविरोधात दुसरे पॅनले उभे राहणार का, याकडे सर्वांच लक्ष राहणार आहे.