जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक 1 डिसेंबरला 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी 1 डिसेंबरला संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणुक प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.

संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनेलने 21 पैकी 19 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. यामध्ये चौदा जागा बिनविरोध झाल्या तर प्रत्यक्ष निवडणुक झालेल्या सातपैकी पाच जागांवर विजय मिळवला. दोन जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सभागृहात 1 डिसेंबरला सकाळी निवडणूक प्रक्रिया होईल. केवळ एक तासाची निवडणूक प्रक्रिया असून अर्ज दाखल करणे, प्राप्त अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे असा कार्यक्रम राहील.
सहकार पॅनेलचे वर्चस्व असल्यामुळे निवडणुकीपुर्वी ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदासाठी पुन्हा डॉ. चोरगे यांचेच नाव राहिल. तसेच उपाध्यक्षपदी पुन्हा बाबाजीराव जाधव यांनाच संधी दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विरोधामध्ये दोनच संचालक असल्यामुळे निवडीची औपचारीकताच होईल अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल केला गेल्यास उर्वरित प्रक्रिया होण्याची शक्यता नाही.