जिल्हा परिषद सदस्यांच्या हाती केवळ महिन्याचा कालावधी; कामे उरकण्याची वाढली लगबग

रत्नागिरी:- विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी केवळ महिन्याचा उरला आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांकडून त्यांची कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पंधरावा वित्त आयोग व सेसचे नियोजन त्याच्या आत होण्यासाठी सदस्यांच्या चकरा वाढल्या आहेत. केवळ महिना उरल्यामुळे सदस्यांची आवराआवरीची लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद सदस्यांना दरवर्षी जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी रस्ते विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण आदी विभागांकडून सदस्यांना निधी मिळत असतो. तसेच सेसमधूनही सदस्यांना निधी मिळत असतो.

या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या नियतव्ययातून सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असून, सदस्यांना त्यांच्या गटांमधील विकासकामांसाठी निधीही मिळाला आहे. त्याच्या प्रशासकीय मान्यता झाल्या असल्या तरी अद्याप निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश बाकी आहेत. त्यामुळे ही कामे आपल्या ठरलेल्या कंत्राटदारालाच मिळावीत यासाठीही सदस्यांकडून प्रयत्न सुरू असल्याने या महिन्याच्या कालावधीत या कामांचा निपटारा करण्यासाठी सदस्यांची व पदाधिकार्‍यांचीही लगबग सुरू आहे.