रत्नागिरी:- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडे भरघोस निधी आहे; परंतु जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पगार देण्यास निधी नाही. गेली दोन महिने कर्मचाऱ्यांच्या पगार रखडला आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने दर महिन्याला पाच तारखेलाच पगार व्हावा, अशी मागणी करणारे पत्र शासनाच्या वित्त विभागाच्या उपसचिवांना पाठविण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने विलंबाने होत आहे. याबाबत वेळोवेळी शासन आदेश / परिपत्रक निर्गमित करण्यात येऊनही या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. वेळेत निधी उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब होत आहे. पगारावर अवलंबून असणाऱ्या मुलांचे शिक्षण, होमलोन, घराचे भाडे त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळेवर पैसे पाठवता न येणे, कुटुंबाच्या औषधोपचारासाठी येणारी आर्थिक अडचण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन निधीअभावी रखडले आहे. लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी कर्मचारी आणि जिल्हा परिषद महिला बालकल्याणच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यात आले होते.