जिल्हा परिषदेत सापडले दोन पॉझिटिव्ह रुग्ण; पदाधिकारी निवडीवर सावट

रत्नागिरी:- जिल्ह्यात काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील दोन कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यांच्या संपर्कात येणार्‍यांची कोरोना चाचणी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तसेच कार्यालयात बाहेरुन येणार्‍यांवर निर्बंध घालण्यात आले असून अत्यावश्यक कामासाठी येणार्‍यांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यांचीही थर्मल तपासणी केली जात आहे.

गतवर्षी कोरोनाने संपूर्ण देशभरात हातपाय पसरण्यास सुरवात केली. त्यानंतर जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी बाधित झाले होते. त्यावेळी कर्मचार्‍यांच्या कार्यालयातील उपस्थितीवर निर्बंध घातले गेले. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर व्यवहार नियमितपणे सुरळीत होते; परंतु नुकतेच दोन कर्मचारी कोरोना बाधित आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातील एक कृषी व बांधकाम विभागागातील कर्मचारी आहे. जिल्हा परिषदेमध्ये विविध भागातून नागरिक भेटीसाठी येत असतात. कर्मचार्‍यांचाही संपर्क त्यांच्याशी येत असतो. यामधून ते कर्मचारी बाधित आले असावेत असा अंदाज बांधला जात आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचार्‍यांच्या चाचण्या त्वरीत करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. दोन्ही विभागाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणार्‍या कार्यालया बाहेरील लोकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. येणार्‍या-जाणार्‍यांची तपासणी केली जात आहे. मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक केले आहे.