रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे व खर्चाचे २०२१-२२ चे सुधारीत ३६ कोटी २२ लाख ०१ हजार १४५ रुपयांचे अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे वित्त विभागाकडे असलेले विविध गुंतवणुकीवरील व्याज वापरण्यास शासनाने परवानगी दिल्याने जिल्हा परिषदेला ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे प्रत्येक विभागाला तरतूद करणे शक्य झाल्याचे समाधान सदस्यांनी व्यक्त केले.
अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रकाचे वाचन केले. कोविड कालावधीत प्राप्त निधीतून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही सभा विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सभापती परशुराम कदम यांच्यासह अन्य सभापती व सदस्य उपस्थित होते. २०२०-२१ या वर्षातील गुंतवणुकीवरील प्राप्त व्याज शासनाला परत करावयाचे आहेत. ती रक्कम विकास कामांसाठी वापरण्यास मिळाली. त्यामुळे ३ कोटी ८८ लाख जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. तर यंदाच्या आर्थिक वर्षात ४ कोटी ४५ लाख रुपये मिळणार असल्याने दोन्ही मिळून सुधारित अंदाजपत्रकात ८ कोटी ३३ लाख भरीव अनुदानाची भर पडली. २१-२२ चे मुळ अंदाजपत्रक तयार करताना जिल्हा परिषदेला किती रक्कम मिळेल याची पुरेशी माहिती नसल्याने पूर्णतः अंदाजावर मांडण्यात आले होते. सध्या प्राप्त झालेल्या रकमांचा विचार करुन भविष्यातील मिळणार्या निधीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सभापती मणचेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी सौ. रचना महाडिक यांनी अंदाजपत्रकाचा ठरावाला अनुमोदन देतानाच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सामोरे जाण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करण्याचा वाव राहील असे सांगितले. तर उदय बने यांनी कोरोनामुळे जिल्हा परिषदेला कमी निधी मिळत असल्याने अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. तेथे झालेल्या चर्चेनुसार व्याजाचे पैसे विकास कामांसाठी वापरण्यास परवानगीही मिळाली. या प्रयत्नांना यश आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करता आली याबद्दल सभागृहात अभिनंदनाचा ठराव सर्वानमुते करण्यात आला.