रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील भागात ५८ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या सहा मजली नवीन प्रशासकीय इमारतीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ‘कॉर्पोरेट लूक’ मध्ये उभी राहणारी ही नव्या इमारतीसाठी तत्कालीन अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन आणला होता.
रत्नागिरी जिल्हा परिषदेची १९६२ ला स्थापना झाली. याठिकाणी प्रशासकीय कारभाराला प्रारंभ झाला होता. आज जिल्हा परिषदेची प्रशासकीय कारभार सुरू असलेली तीन मजली भव्य इमारत जीर्ण होत आलेली आहे. त्यामुळे या इमारतीला पर्याय म्हणून नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला चालना देण्याचा निर्णय तत्कालीन सत्ताधा-यांनी घेतला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱया जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे, योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जातात. अशा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात अधिक गतीमानता आणण्यासाठी जि.प.ची इमारतही प्रशस्त असावी यासाठी मागील पाउल उचलले. नवीन प्रशासकीय इमारत बेसमेंट, तळमजला अधिक सहा मजली संपूर्ण कॉर्पोरेट लूक अशी ही नवीन इमारत असणार आहे. या इमारतीी व्हीआयपींसाठी कॅप्सूल लिफ्टची व्यवस्था तर इतरांसाठी अन्य दोन लीफ्टची व्यवस्था राहणार आहे. इमारतीला म्युरलने सुशोभिकरण तर संपूर्ण परिसर सुंदर व विविध प्रकारच्या झाडांनी सुशोभित केला जाणार असल्याचे इमारतीच्या आराखडा सादरीकरण करण्यात आले होते. या इमारतीच्या पायाचे काम वेगाने सुरु आहे. दोन वर्षात ही इमारत उभी रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.