जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी परीक्षा जाहीर

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या पाच पदांच्या जागांसाठी 1 व 2 नोव्हेंबर 2023 रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील महिन्यात काही पदांच्या परिक्षा झाल्या होत्या. आता या दुसर्‍या टप्प्यातील परिक्षा असून अजूनही तिसर्‍या टप्प्यात परिक्षा होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या 18 पदांच्या रत्नागिरी जिल्ह्यात 715 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी तब्बल 70 हजार 608 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील गेल्या महिन्यात पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी, विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदासाठीच्या परिक्षा झाल्या होत्या.
आता दुसर्‍या टप्प्यातील परिक्षा होणार आहेत. त्यानुसार 1 नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक या पदासाठी तर 2 नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी शिक्षण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची परिक्षा होणार आहे. या उमेदवारांचे ऑनलाईन प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

ग्रामसेवक पदासाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. 185 जागांसाठी तब्बल 41 हजार 145 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या परिक्षेसाठी नियोजन केले जात आहे. अजून तारीख निश्चित झाली नसली तरी दिवाळीनंतर परिक्षा होण्याची शक्यता आहे.