जिल्हा नियोजनच्या ४४० कोटी पैकी १६० कोटींचा निधी देण्याला तत्वतः मान्यता

रत्नागिरी:- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ साठी यंत्रणेचा ७६५.५६ कोटी मागणीचा ठराव सर्वोनुमते करताना, पुढील वर्षी २०२४-२५ करिता ४४०कोटी निधी मिळावा, या ठरावाला बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना.अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढव्यात ४४० कोटी पैकी १६० कोटी रु.चा निधी देण्याला तत्वत: मान्यता दिल्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. ते पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या निधीची माहिती दिली.नाविण्यपूर्ण योजनेसाठी ९.५९ कोटी, शाश्वत विकास ध्येयांसाठी सुक्ष्म प्रकल्प २.९४ कोटी, मुल्यमापन, सनियंत्रण व डाटा एन्ट्री १.६७ कोटी तसेच गाभा क्षेत्र ४६४.२० कोटी, बिगर गाभा क्षेत्र २८७.६६ कोटी अशी एकूण ७६५.५६ कोटी यंत्रणेंची मागणी आहे. कमाल आर्थिक मर्यादा २८० कोटीची आहे. जनसुविधा कार्यक्रम ४० कोटी, साकव बांधकाम व दुरुस्ती ४० कोटी, रस्ते विकास कार्यक्रम ४० कोटी, शाळा दुरुस्ती व नवीन वर्ग खोली बांधकाम १० कोटी, पर्यटन विकास १० कोटी, नगरोत्थान महाअभियान १०कोटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विकास १० कोटी अशी एकूण १६० कोटींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्यास मान्यता देण्यात आली.
जनसुविधेला मूळ आराखड्यातून २७ कोटी तर अतिरिक्त ४० कोटी निधी दिला जाणार आहे. त्यातून ९२ ग्रामपंचायतींची इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. २३ नव्या गटारांचा समावेश आहे. तर ४०६ स्मशानभूमी शेड दुरुस्ती, नव्याने उभारणे हि कामे घेण्यात येणार आहेत. तर साकवासाठी मूळ आराखड्यात १८ कोटी रु. व अतिरिक्त ४० कोटी रु.देण्यात आले आहेत. त्यामध्ये २०६ साकव उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. तर ३८३ साकवांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी मूU आराखड्यात २० कोटी व अतिरिक्त ४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामधून ६ हजार ८०५ किलो मिटर रस्त्यापैकी १३०६ किलो मिटर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पर्यटनासाठी मूळ आराखड्यात ३५० कोटी तर अतिरिक्त १० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. तर रत्नागिरी मेडिकल महाविद्यालयातील उपकरणांसाठी १० कोटींची तरतून करण्यात आली आहे. तर ५१० शाळांच्या दुरुस्ती, नव्या वर्ग खोल्यासाठी ६० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्रर सिंह यांनी सांगितले.

गणपतीपुळे विकास आराखड्याच्या मंजूर १०२ कोटी निधीपैकी ४० कोटींचा निधी अध्यापपर्यंत प्राप्त झाला आहे. त्यातील २५ कोटींचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर त्यातून पुढील कामे करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.