आर्थिक वर्षात २३ हजार ३८२ देयके सादर
रत्नागिरी:- आर्थिक वर्ष जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ अखेर शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची अखेर सुमारे २३ हजार ३८२ देयके जिल्हा कोषागार कार्यालयात जमा झाली. त्यापोटी सुमारे ३,१०० कोटी १८ लाख रुपयांच्या वाटपाची आर्थिक उलाढाल झाल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी प्र. शं. बिरादार यांनी सांगितले.
आर्थिक वर्षाअखेर शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची अखेर ३१ मार्च रोजी झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाचे अर्थसंकल्पीय अनुदान वर्षाच्या अखेरच्या दिवशी विविध विभागांकडून अदा करण्यात येते. त्यात शासकीय योजना व अनुदानाचा तसेच कामांच्या देयकांचा संबंध असतो. त्याचप्रमाणे शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय देयके, प्रवास बिले, कार्यालयीन खर्चही आर्थिक वर्षाअखेर अदा केले जात असतात. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामकाजावर मार्च महिन्यात ताण
पडतो. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयाकडे २३,३८२ देयके सादर करण्यात आली होती. त्यापोटी सुमारे ३,१०० कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. या साऱ्या आर्थिक व्यवहारांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा लेखा कोषागार व उपकोषागार कार्यालयाची मोठी तारांबळ झाली होती. शासनाने सर्वच खात्यांना पत्र पाठवून कार्यालयीन देयके मार्चपर्यंत सादर
करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात मार्चपासून देयके सादर करण्याची गतीने कार्यवाही सुरू होती. आलेल्या देयकांची तपासणी व शासनाने केलेली आर्थिक तरतूद तपासून तत्काळ देयके अदा करण्यास सुरुवात करण्यात आली.
गेल्या आर्थिक वर्षभरातील देयके व झालेल्या वाटपांचा तपशील पाहता एप्रिल २०२४ मध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभाला ८५० देयके सादर झाली तर सुमारे २३८ कोटींचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर पुढील महिन्यागणिक हा आलेख कधी कमी तर अधिक असा राहिला. मे २०२४ मध्ये सादर झालेली देयकांची संख्या १,६७२ इतकी पोहचली होती. जूनमध्ये १,४७१, जुलैमध्ये २,०६८ देयके, ऑगस्टमध्ये २,००९ देयके, सप्टेंबरमध्ये १,४४० देयके, ऑक्टोबरमध्ये २,५०३ देयके, नोव्हेंबरमध्ये १०१७ देयके, डिसेंबरमध्ये १,७७३ देयके सादर झाली होती. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये २,१०२ देयके, फेब्रुवारी मध्ये १,८८२ देयके आणि मार्चमध्ये ४,५९५ देयके सादर करण्यात आली.